अकोला - तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथे जमिनीच्या वादातून बाप लेकास जीवे मारण्याचा प्रकार आज घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तेल्हारा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. देविदास भोजने आणि मुलगा अजय भोजने यांचा या मारहाणीत मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहत होते. गावातीलच राहणाऱ्या भोजने परिवाराचा जमिनीचा वाद बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे भोजने परिवार पुन्हा समोरासमोर आले. यामध्ये देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबरदस्त प्रहार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. तर ही मारहाण पाहून वडिलांना वाचविण्यासाठी आलेल्या अजय देवीदास भोजने यालाही जबर मारहाण करण्यात आली. तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर गावात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. देविदास भोजने यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर अजय भोजने हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा ही मृत्यू झाला आहे. तेल्हारा पोलिसांनी यामध्ये संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी -
तेल्हारा पोलिसांनी यामध्ये तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हत्येत वापरण्यात आलेले शस्त्र ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलीस या तिघांची कसून चौकशी करीत असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी तेल्हारा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.