अकोला : जिल्ह्यातील खामखेड येथे एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन दहशत पसरविल्याने ( Took sword and created terror ) गावात एकच खळबळ उडाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव ( After losing the Gram Panchayat election ) झाल्याचे जिव्हारी लागल्याने पराभूत उमेदवार समर्थकाने हातात तलवार घेऊन मतदारांना मत का दिले नाही, आता सर्वांचा हिशोब होईल, असे म्हणत गावात चांगलाच उच्छाद मांडला. याप्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दहशत पसरिवण्याचा प्रयत्न : पातूर तालुक्यातील खामखेड येथील रहिवासी सुरेश धोंडूराम गुंजकर हा हातात तलवार घेऊन गावात शिवीगाळ करत एका घरासमोर आला असता कुसुम रामदास शेळके या वयोवृद्ध महिलेने 'तू माझे घरासमोर येऊन कोणाला व का शिवीगाळ करत आहेस', अशी विचारणा केली असता सुरेश गुंजकर याने सदर महिलेवर हल्लाबोल करून तिचा हात पिरगाळून झटापट केली. या झटापटीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटली, त्या वयोवृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा राजू काळे ( वय 24 ) रा.खामखेड यास सुरेश गुंजकर याने धक्काबुक्की करीत असताना कृष्णा यांच्या छातीजवळ तलवार किरकोळ लागली.
पराभव लागला जिव्हारी : खामखेड ग्रामपंचायतमध्ये मागील तीस वर्षांपासून गुंजकर परिवारातीलच सरपंच निवडून येत होता, असे असतांना यावेळेस पहिल्यांदा त्यांचा पराभव झाल्यामुळे सुरेश गुंजकर याच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याने हातात तलवार घेऊन गावातील मतदारांनी आम्हाला मतदान केले नसून "आता सर्वांचा हिशोब होईल, आता तलवार आणली उद्या ज्याने आम्हास मतदान केले नाही, त्यास बंदुकीच्या फैरी दाखवतो,' असे फिर्यादीने सांगितले. या प्रकरणी कृष्णा राजू काळे यांचे फिर्यादीवरून आरोपी सुरेश धोंडूराम गुंजकर याच्याविरोधात पातूर पोलिसांत कलम 4, 25 शस्त्र अधिनियम 1959 तसेच कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर आरोपी फरार असून आरोपीचा शोध व अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.