अकोला - शहरातीलमध्य वस्तीत येणाऱ्या लक्कडगंज येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत चार दुकाने व तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाच्या दिरंगाईमुळे आग विझवण्यास विलंब झाल्याने नुकसान झाले आहे.
दुकानांसह तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी-
लक्कडगंज येथे लाकडाचे काम होत असल्याने आगीने भीषण रूप धारण करून येथील विदर्भ टिंबर, दुर्गेश टिंबर मर्चंट, डेहनकर टिंबर मार्ट, नूर अहेमद टिंबर मर्चंट ही चार दुकाने व तीन घर या आगीच्या भक्ष्यस्थानी आले. या दुकानातील साहित्य आणि बाकी चार घरातील साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे ४० ते ४५ लाखाचे नुकसान झाले. ही आग ही शॉक सर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग एवढी भीषण होती की या आगीच्या ज्वाला बऱ्याच दुरून दिसत होत्या.
अग्निशामक दलाची दिरंगाई-
आग लागल्याची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला असता, बऱ्याच वेळानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याकरिता सहा बंब लागले. तरी किमान १५ मिनिटाच्या अंतरावर एक एक बंब घटनास्थळी पोहोचल्याने आग विझवण्यास विलंब झाला. अग्निशमन दलाच्या या ढेपाळलेला कारभारामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला.