अकोला - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नेहमीच लाच स्वीकारणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करीत असते. मात्र, लाच देणाऱ्यांवर कारवाई क्वचितच होत असते. अशीच कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागान केली आहे. पोलीस निरीक्षक यांना लाच देणाऱ्या तिघांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या तिघांनाही 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दहीहंडा पोलीस निरीक्षक यांना शिवा गोपाळराव मगर, अभिजित रविकांत पागृत, घनशाम गजानन कडू या तिघांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू, वरली मटका असे अवैधधंदा सुरु करण्यासाठी तक्रारदार लोकसेवक यांना 50 हजार रुपयांच्या लाचेचे प्रलोभन दिले. त्यानंतर आरोपींनी तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच प्रलोभन मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता देण्याकरीता तिघांनी ठरलेल्या ठिकाणी भेटून 25 हजार रुपयांची लाच पोलीस निरीक्षक यांना दिली. ही रक्कम देताच पोलीस निरीक्षक यांनी पथकाला माहिती दिली. त्यांनी या तिघांनाही रंगेहाथ पकडून त्यांच्याकडील 25 हजार रुपयांची रक्कम जप्त केली. या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांनाही 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.