अकोला - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व सभा खुल्या स्वरूपात घेण्यास निर्बंध लावले होते. त्यासोबतच पुढील आदेशापर्यंत सभा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचे आदेश दिले होते. पण, यानंतर सर्व सभा पूर्वी प्रमाणे सुरक्षित अंतर ठेवून घेण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्व सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या व सर्वसाधारण सभा गत सात महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. दरम्यान, बहुतांश सदस्य ग्रामीण भागात राहत असल्याने ऑनलाइन सभेत नेटवर्कचा खोळंबा होत होता. त्यामुळे सदस्यांना ऑनलाइन सभेवर आक्षेपही नोंदवला होता. दरम्यान, आता कोविडच्या अनुषंगाने टाळेबंदीतील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सभा सुरक्षित अंतर व कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन पूर्वीप्रमाणे घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या मुलांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
हेही वाचा - नियमित वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना बसतोय 'करंट'