अकोला - अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्त म्हणून 7 एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत स्वच्छतागृहात रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले आहे.
मृत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३० वर्षे, मुळ रा. सालपडा. जि.नागाव, आसाम, हल्ली रा. रा. पातूर) याचा शुक्रवारी (दि. 10 एप्रिल) अहवाल आला होता. अहवालानुसार तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे.
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना, अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचारार्थ दाखल असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.10 एप्रिल) रात्री घडली. हा प्रकार आज (दि. 11 एप्रिल) उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, या संदर्भात तपास करत आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 13 असून त्यातीलच एकान आत्महत्या केली आहे. आणखी काही जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतर रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - #लॉकडाऊन : कारागृहातील सेंद्रीय भाजीपाला अन्नछत्रांसाठी एका फोनवर पुरविण्याचा अकोला कारागृहाचा प्रयत्न