अकोला - थंडी आणि वाढते ऊन याचा अनुभव अकोलेकर घेत आहेत. अकोल्याचा रात्रीचा थंडीचा पारा १५व १६ अंशावर असून दुपारचा पारा ३६ व ३७ अंशावर जात आहे. त्यामुळे अकोलेकर हिवाळा आणि उन्हाळा सोबत अनुभवत आहेत.
हिवाळा ऋतू संपायला आला असला, तरी उन्हाची तिव्रता वाढत आहे. हिवाळ्यात दुपारचे तापमान ३० अंशाच्या आत आणि रात्रीचे तापमान साडेपाच अंशावर पोहोचले. हळूहळू तापमानात चढउतार दिसून येत आहे. रात्री सारखेच दिवसाचे तापमान वाढायला लागले आहे. या तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. सध्या तापमान वाढत आहे. गेल्या आठ दिवसांतील रात्रीचे तापमान १५.६ अंशावर पोहोचले आहे. तर दिवसाचे तापमान ३६ व ३७.२ अंशावर गेले आहे.
विदर्भातील अकोला हे जास्त तापणारे शहर आहे. या शहराचे तापमान मागील वर्षी ४६ च्यावर गेले होते. उन्हाळ्याला सुरुवात होण्याआधीच तापमान 37 अंशावर जात असल्याने यावर्षी किती तापमान वाढेल, अशी चर्चा आहे. तसेच वाढते तापमान पाहता वाहनचालक आणि पादचारी हे उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल चेहऱ्यावर बांधताना दिसत आहेत.