अकोला - अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच तापमानातही वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान 44.9 अंश सेल्सिअसवर आहे. तर किमान तापमानात थोड्याफार अंशाने बदल होत आहे. तीन दिवसापासून कमाल तापमान स्थिर असल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे.
अकोल्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढली असतानाच तापमानातही वाढ झाल्याने अकोलेकर गरमीने त्रस्त झाले आहेत. तापमान वाढीमुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यावर पोलिसही चौकाचौकात उभे असले तरी तेही आता सावलीचा किंबहुना झाडाखाली थांबण्यासाठी आधार घेत आहे.
1 मेला कमाल तपमान 43.2 अंश तर किमान तपमान 27.4 अंश होते. त्यानंतर तापमानात एकदमच वाढ झाली. 2 मेला किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 44.8 अंश सेल्सिअस होते. तर 3 मेला किमान 28.3 व कमाल 44.9 अंश सेल्सिअस होते. तर 4 मेला किमान तापमान 28.1अंश तर कमाल तापमान 44.9 अंश सेल्सिअस होते.