अकोला - तापमानाच्या आकडेवारीमध्ये अकोला हे देशात सर्वात जास्त उष्ण शहर म्हणून गणले गेले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अकोल्याचे तापमान ४७.२ अंशावर पोहोचले होते. त्यात आणखी घट होत हे तापमान ४२.२ अंशावर येऊन थांबले आहे. त्यामुळे अकोल्याचे तापमान तब्बल ५ अंशांनी घटले आहे.
आठ दिवसांपूर्वी ४७.२ अंशावर पोहोचलेले अकोल्याचे तापमान आता खाली आले आहे. या तापमानात पाच अंशांनी घट झाली आहे. तापमानातील पारा कमी झाल्याने उन्हाची तीव्रता कमी होती. मात्र, हे ऊन अंगाला चटके लावत होतेच. उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी उन्हापासून बचाव करण्यासाठी अकोलेकर डोक्यात टोपी किंवा कानाला दुपट्टा बांधूनच घराच्या बाहेर पडले.
मागील आठवड्यात २४ एप्रिल ला ४५.७ अंश, दुसऱ्या दिवशी ४६.३ अंश, २६ एप्रिलला ४६.४ अंश, २७ एप्रिलला ४६.७ अंश, २८ एप्रिलला ४७.२ अंश, २९ एप्रिलला ४६.९ अंश आणि ३० एप्रिलला ४५.२ तसेच १ मे ला ४३.७ अंशावर तापमान होते. चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने तापमान बदलत गेले. तापमानातील चढउतारामुळे उष्माघाताने दगावल्याची अधिकृत माहिती नाही. तर उष्माघात कक्षात ३ महिला व एका पुरुषावर उपचार सुरू होते. दरम्यान, आजच्या तापमानात झालेली घट किती दिवस राहते, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.