अकोला - कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात आली. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी अकोला जिल्ह्यात सुरू झाली असून सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू झाली आणि बाजारपेठत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागल्याने हातावर पोट असणारे शिंपी व्यावसायिकही वडिलोपार्जित व्यवसायावर परत आले. कोरोना संकटावर मात करत पुन्हा एकदा नव्या उमेदीने व्यवसाय सुरू केला. केंद्र सरकारने रस्त्यावर काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना जे आश्वासन दिले आहे, ते कधी पूर्ण होईल? याकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या 60 वर्षांपासून अकोल्यातील सावतराम मिल या चाळीमध्ये जुन्या कपड्यांना रप्पू मारणे, अल्टर करणे हा व्यवसाय शिंपी बांधव करत आले आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे सुमारे शंभर ते दोनशे व्यावसायिक अडीच महिन्यापासून घरीच होते. या काळात फक्त शासनाच्या गरीब कल्याण योजनांचा त्यांना आधार मिळाला. दिवसभर उन्हात काम केल्यानंतर 200 ते 500 रुपयांपर्यंत त्यांना मजुरी मिळत होती. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुरू असलेला संघर्ष अजूनही कायम आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांची खबरदारी घेत व्यवसाय सुरू केला असला तरीही ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याची खंत या व्यवसायिकांनी बोलून दाखवली. येणाऱ्या काही दिवसांत सगळे सुरळीत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन काळात अकोल्यातील सावतराम मील चाळीतील ठप्प झालेल्या शिवणकाम व्यवसायाला आज गती मिळाली आहे. अडीच महिन्याच्या कालावधीनंतर काही ट्रेलरनी पुन्हा व्यवसाय सुरू केला असून उत्पन्न मिळविण्याचा वेग संथ आहे, असे ते म्हणाले. या चाळीमध्ये गेल्या साठ वर्षांपासून 100 ते 150 लोक शिवणकाम करतात. त्यांची रोजीरोटी शिवणकामावर अवलंबून आहे. या संकट काळात उसनवारी आणि उधारीवर पैसे घेऊन कसाबसा उदरनिर्वाह भागविला, अशी माहिती शिंपी व्यावसायिकांनी दिली.