अकोला - शहरातील हरिहर पेठमध्ये एका घरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी भेसळ युक्त एक लाख रुपये किमतीची मिठाई जप्त केली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिठाईचे नमुने प्रयोग शाळेत पाठविले आहेत. १ लाख एक हजार ७०० रुपयाची ही मिठाई असल्याची माहिती आहे.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
येथील हरिहर पेठ, हनुमान मंदिराजवळ एका घरातून आरोपी शुभम श्यामशरण पांडे याच्या ताब्यातून इंडियन मिल्क स्वीट मिठाई (राधाकृष्ण ब्रँड) ६८० किलो जप्त केली. या मिठाईची किंमत १ लाख एक हजार ७०० रुपये आहे. ही मिठाई शुभम पांडे याने मराठवाड्यातून आणल्याचे सांगितले आहे. मिठाई पाम तेल व दूध पावडरपासून तयार करण्यात आली आहे. या मिठाईला खवा म्हणून स्वीट मार्ट व्यावसायिकांना तो विकत होता.
मिठाईचा नमूना प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट व्यावसायिकांना त्यांनी केवळ दुधापासून तयार करण्यात आलेल्या खव्याची मिठाई तयार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे व गजानन गोरे यांनी सहायक आयुक्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केली.