अकोला- अकोला सर्वोपचार रुग्णालयात कोरोना विषाणू आजाराने ग्रस्त असलेल्या संशयित रुग्णाचे तपासणी अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. रुग्णाला कोरोना आजार नाही असे अहवालातून स्पष्ठ झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले आहे.
मूळची अकोला येथील असलेली २४ वर्षीय तरुणी दोन दिवसापूर्वी जर्मनी येथून आल्यानंतर तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणीला कोरोना आजार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना अधिकाऱ्यांनी तिच्या रक्ताचे आणि थुकींचे नमुने पुणे येथे पाठविले होते. पुणे येथून आलेला वैद्यकीय अहवाल हा निगेटिव्ह असल्यामुळे या २४ वर्षीय तरुणीला कोरोना विषाणू झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त व्यक्ती किवा परदेशातून कोरोनाची लागन होऊन आलेला व्यक्ती जिल्ह्यात आढळला नसल्याचे डॉ. राजकुमार चौहान यांनी सांगितले आहे. विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींनी खबरदारी म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आपली माहिती द्यावी, असे आवाहनही डॉ. राजकुमार चौहान यांनी केले आहे.