अकोला: महिलांनी एकाच वेळी अशी धाडशी मोहीम करणे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. एव्हरेस्ट सर करणे हे भल्याभल्यांना ही जमत नाही. परंतु, दृढनिश्चय, हिंमत, जिद्द असेल तर कोणतेही गोष्ट सहज शक्य होते. याचाच प्रत्य येथील वैद्यकीय क्षेत्रात वावरणाऱ्या साठीतील तीन जणांनी करून दाखविला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला असून त्यांच्या या कामगिरीने अकोल्याचेच नाव नाही तर राज्याचे नाव देशपातळीवर उंचावले आहे.
गिर्यारोहणाची खडतर मोहीम पूर्ण केली: येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सौ. अंजली राजेंद्र सोनोने आणि श्रीमती सुरेखा दिलीप सोनोने या एकाच कुटुंबातील दोन साठीतील महिलांनी जगातील अतिशय खडतर, धोकादायक अश्या एव्हरेस्ट बेस कॅम्पची गिर्यारोहणाची खडतर मोहीम तीन मे रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अकोल्याच्या गिर्यारोहण मोहिमेत एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे. ज्या जिल्ह्यात दोन सक्षम महिला अधिकारी लाभल्या त्या जिल्ह्यातील ह्या दोन महिलांनी एकाच वेळी अशी धाडशी मोहिम फत्ते करणे ही पुर्ण जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. यांच्यासोबत डॉ. राजेंद्र सोनोने यांनीसुद्धा या गिर्यारोहणाच्या मोहिमेत भाग घेऊन, एकाच कुटुंबातील तिघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची ही प्रथमच वेळ आहे.
बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला: हिमालयातील या अतिशय दुर्गम भागात, कधी खडकाळ तर कुठे दरीच्या अगदी काठावरून जात ही मोहीम फत्ते करण्यासाठी खुप मोठे धाडस लागते. जसे जसे समुद्रसपाटीपासूनवर जातो तसतशी हवा विरळ होऊन प्राणवायुचे प्रमाण खुप कमी व्हायला लागते. एक एक पाऊल टाकायला येथे दम लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचा गिर्यारोहकांना येथे खुप अनुभव येतो. सोनोने कुटूंबियांना सुध्दा या सर्व विपरीत परिस्थितींचा सामना करावा लागला. पण न डगमगता, हिमतीने त्यांनी प्रसंगी सतत कोसळणाऱ्या पावसात आणि सतत होणाऱ्या हिमवर्षावात, उणे २०डिग्री तापमानातही आपली मोहिम आठ दिवसांत यशस्विरित्या फत्ते केली. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा मोठ्या दिमाखात फडकवला.
सोशलमीडियावर केले लाईव्ह: विशेष म्हणजे, एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करतानाचा प्रसंग त्यांनी सोशलमीडियावर लाईव्ह दाखवून सर्व मित्रमंडळींना ह्या ऐतिहासिक क्षणाच्या आनंदात सहभागी केले. या त्रयीने ही मोहीम २६ एप्रिल रोजी लुक्ला ह्या नेपाळमधील हिमालयाच्या अत्यंत दुर्गम भागातील गावातुन सुरू केली होती. लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप, काला पत्थर असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत तीन मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ही त्रयी यशस्वीरीत्या पोहोचली. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा समुद्रसपाटीपासून ५,३६४ मिटर एवढ्या उंचीवर आहे. जेथे वर्षभर चोहोबाजूंनी बर्फचबर्फ असून उणे २० डिग्री सेल्सिअस तापमान असते.
डॉ. अंजली आणि श्रीमती सुरेखा यांचा हा आयुष्यातील पहिला ट्रेक असुनसुद्धा त्यांनी दृढ निश्चयाने तो यशस्वी रित्या पुर्ण केला. डॉ. राजेंद्र सोनोने हे एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षा ३०० मिटर अधिक उंचावर असलेल्या लेह येथील खरदुंगला पास सायकलने सर करणारे पहिले सायकलस्वार आहेत. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. हा ट्रेक फत्ते करण्यासाठी विशेष तयारीसाठी त्यांना मुंबई येथील डॉ. रमेश कदम, नाशिक येथील महाजन बंधू, अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत, स्वतःचे ट्रेनर अर्जुन पाटील आणि काठमांडू येथील त्यांचे मॅराथॉन मित्र श्री शेर थारू यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सिकनेस आजार होण्याची भीती: या मोहिमेदरम्यान समुद्रसपाटीपासून खुप उंचीवर गेल्यामुळे ॲक्युट माऊन्टेन सिकनेस नावाचा जिवघेणा आजार होण्याची शक्यता असते. तो होऊ नये म्हणून या मोहिमेत नामचे बजार आणि दिंगबोचे या दोन ठिकाणी शरीराची त्या उंचीसाठी अनुकुलता यावी, कमी प्राणवायुतही दुर्गम भाग चढता यावा यासाठी ॲक्लिमटायझन किंवा अनुकुलता ट्रेकसुध्दा त्यांनी केला.
पाठीवर होते पंधरा किलोचे वजन: पाठीवर १० ते १५ किलोचे ओझे घेवून दररोज १० ते १२ तास हिमालय चढत जाण्याचे, दिव्य या तिघांनी वयाच्या साठीत असताना करून तरूण पिढीला एक मोठा आदर्श घालून दिला. विशेष बाब म्हणजे ही मोहीम त्यांनी स्वतःहून आखली, त्यात कुठल्याही प्रवासी कंपनीचा सहभाग नव्हता. ह्या मोहिमेदरम्यान त्यांनी सर्व आवश्यक बाबींचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे आतापर्यंतचा त्यांचा ट्रेक कुठलेही गालबोट न लागता निर्धोक झाला.