अकोला - राज्य सरकारने अनलॉक ४ मध्ये मंदिरे उघडण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. राज्य सरकारला मंदिराकडून पैसे पाहिजे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय व वंचित बहुजन आघाडीने मंदिरे खुली व्हावी, यासाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री यांनी एसओपी तयार करून निर्णय घेतो, असे सांगितले होते. शासनाला मंदिराकडून पैसे हवे आहेत. मोठ्या संस्थांनी सरकारला पैसे दिले आहेत. केंद्र सरकारने अनलॉक ४ मध्ये मंदिरे खुली करण्याचे म्हटले होते. अनेक मोठ्या मंदिर संस्थांनी मंदिरे खुली केल्यास आम्हीच टेस्टिंग करू, एखादा भक्त हा जर पॉझिटिव्ह आढळला तर त्यावरही आम्हीच उपचार करू, शासनाला हवे तिथे हॉस्पिटल बांधून देण्यासही तयार आहे, असे सांगितले होते. मात्र, शासनाकडून त्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. मॉल, बाजारपेठ, दारूची दुकाने सुरू केलीत, मात्र मंदिरे बंद ठेवून धार्मिकतेबाबत आस्था नसल्याचे सरकारने दाखवून दिले आहे, असे मत प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्री आचार्य उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आचार्य अजित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हरी भक्त पारायण यांच्यासोबत वाकडे आहे का? हरिभक्त पारायण यांनी मागणी केली म्हणून त्यांना राग आला आहे का? किंबहुना वंचित बहुजन आघाडीला त्यांनी सोबत घेतले म्हणून त्यांना राग आला असावा, असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले.
सोबतच त्यांनी बिहार निवडणुकीच्या संदर्भातही भाष्य केले. बिहार निवडणुकीच्या निकालांमध्ये स्पष्ट बहुमत कुणालाच मिळणार नाही. वंचित बहुजनसोबत झालेल्या आघाडीमध्ये २० ते २२ जागांवर आम्ही विजयी होऊ, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रशांत बोर्डे, पुरुषोत्तम अहीर, महादेव शिरसाट, विलास जगताप, पराग गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.
हेही वाचा- कापसावर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; सरकार विरोधात रोष