अकोला - शहरापासून जवळच असलेल्या आपोती (बु) गावात आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले. ही आग अर्ध्या गावात पसरली. त्यामुळे गावातील जवळपास ४ ते ५ घरांसह १५ ते १६ गुरांचे गोठे जळून खाक झाले आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आपोती (बु) गावात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग पाहता पाहता पूर्ण परिसरात पसरली. घटनेची माहिती मिळताच अकोला महानगर पालिकेचे चार अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, हवेचा वेग जास्त असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले.
या आगीत घरातील कापूस आणि धान्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. गुरांच्या गोठ्यामध्ये ठेवलेल्या चाऱ्यामुळे आगीने चांगलाच पेट घेतला. या आगीत १५ हून अधिक गुरांचे गोठे जळून खाक झाले आहेत. त्यामध्ये ठेवलेले शेतीचे साहित्य आदी जळून खाक झाले.