अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे १० पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर शरद पवार पंतप्रधान होतील, असे भाकीत राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी केले आहे. अकोला येथे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मेमन म्हणाले की, शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षात चांगले संबंध आहेत. संसदेत कामकाज सुरू असताना सभागृह स्थगित झाले, तर सर्व नेते त्यांच्याजवळ जमतात. एखादे विधेयक तयार करायचे असेल, तर त्या विधेयकाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतात, अशी माहिती मेमन यांनी दिली.
दुर्भाग्याने राष्ट्रवादी काँग्रेस इतका मोठा पक्ष नाही. आमचे जर जास्त खासदार निवडून आले असते तर शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकले नसते. दोन-तीन खासदार असणारे देवेगौडाही या देशात पंतप्रधान झाले. आघाडी सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर शरद पवारांचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर असेल, असे मेमन म्हणाले.