अकोला - जिल्ह्यातील भौरद येथील लोकशाहीर मुधुकर नावकार यांना शासनमान्य राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा फटका त्यांनाही बसला आहे. शासकीय योजनांची माहिती पवाडे आणि शाहीरीतून लोकांपर्यंत पोहचवण्याचे ते काम करतात. मात्र, आता हे काम बंद असून त्याच्यांवर भाजीपाला विकुन कुटुंब चालवण्याची वेळ आली आहे.
कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने आले आहेत. त्यामुळे शासकीय कामे मिळणे बंद झाले आहेत. त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी लोकशाही मधुकर यांनी भाजीपाला विकणे सुरू केले. मात्र, यात यश न आल्याने आता ते झिंगे, बोंबील विकून घरगाडा चालवत आहेत. मधुकर यांच्या शाहीरी पथकातील इतरांचीही काहीशी तशीच परिस्थिती आहे.
लोकशाहीर मधुकर नावकार हे त्यांच्या पथकासह शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गावोगावी फिरत होते. तुटपुंज्या मानधनावर पथकासह जिल्हाभर फिरायचे. निवडणूक काळात तर दिवसरात्र ते गाणे गाऊन निवडणूक कशाप्रकारे आदर्श करता येईल यासाठी परिश्रम घेत होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासह आरोग्य विभागासाठी ते काम करीत होते. मिळणाऱ्या मानधनावर पथकातील नागरिकांना मानधन व उरलेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. मात्र, टाळेबंदी लागल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार बंद झाल्याने मधुकर अडचणीत सापडले आहेत.
कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात लोकशाहीर व त्यांच्या पथकावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे पथकातील नागरिकांना सोबत घेऊन मधुकर यांनी गावात भाजीपाला विकला. परंतु, आधीपासूनच भाजीपाला व्यवसाय करणाऱ्यांना ते टक्कर देऊ शकले नाही. परिणामी, त्यांना यात यश आले नाही. शेवटी त्यांनी मत्स्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यामध्येही ते अपयशी ठरले.
उतरत्या वयात कुठलेही काम करण्यासाठी असमर्थ असलेल्या लोकशाहीर यांना आपल्या गायिकेने जगविले आहे. परंतु, शासनाने योजनांचा प्रचार व प्रसार करण्यास बंद केल्याने हे शाहीर आता पुरते देशोधडीला लागले आहे. त्यामुळे त्यांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा लागली आहे.