अकोला - आमदार अबू असीम आझमी यांच्यावर मुंबईतील गोवंडीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव अॅड. नजीब शेख यांनी आझमी यांना शासनाने झेड सुरक्षा देण्याची मागणी केली.
चार दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेविरोधात नजीब शेख यांनी भाजप आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. गोंवडी मतदारसंघातून काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही. तेथे समाजवादी पक्षाचे सात नगरसेवक आहेत. त्यामुळे काँग्रेस वारंवार समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला चढवित असते. या घटनेचे पडसाद आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोसावे लागतील, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि भाजप दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप नजीब यांनी यावेळी केला.