अकोला - शहरातील गांधी रोडवरील एका कोपऱ्यात बेवारसरीत्या सापडलेल्या सुटकेसमुळे बॉम्ब असल्याची अफवा आज सायंकाळी पसरली होती. बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळाचा ताबा घेत सुटकेची तपासणी केली. या सुटकेसमध्ये कपड्यांव्यतिरिक्त दुसरे काहीच न निघाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तसेच, येथील वाहतूकही बंद करण्यात आली होती.
गांधी रोडवरील एका दुकानाच्या बाजूने असलेल्या खुल्या जागेत काळ्या रंगाची सुटकेस बऱ्याच वेळापासून पडली होती. ही सूटकेस नेमकी कोणाची आहे, यासंदर्भात कोणीच माहिती देत नसल्याने या सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली. या संदर्भातली माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. त्यानंतर श्वान पथकही तेथे दाखल झाले. बॉम्बशोधक पथकाने सुटकेसमध्ये ज्वलनशील पदार्थ किंवा बॉम्ब असल्याच्या संशयवारून सर्वच कवायती केल्या. मात्र, त्यामध्ये कुठलेही ज्वलनशील पदार्थ किंवा बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले.
शेवटी पथकाने दोरीच्या साह्याने बांधून ती सूटकेस उघडली. त्यामधून कुठल्याच प्रकारचा आवाज न येता फक्त कपडे बाहेर निघाले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा सगळा प्रकार चालू असताना दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच बघणाऱ्यांनाही दूर उभे करण्यात आले. या अफवेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रत्येक जण बॉम्ब असल्याच्या ठिकाणी दाखल होत होते. त्यामुळे पोलिसांना नागरिकांना पांगवण्यासाठी बरीच परीश्रम करावे लागले. ही सुटकेस नेमकी कोणाची होती, याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही.