अकोला - शिवसेना वसाहतीमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. यावर बंदी आणावी, या मागणीसाठी शिवसेना वसाहतीच्या नगरसेविका सपना नवले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना आज सायंकाळी निवेदन दिले. यावेळी कारवाईचे आश्वासन देऊन पोलीस निरीक्षकांनी नगरसेविकेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा- भाजपची तटस्थ भूमिका? शिवसेना करणार सत्तास्थापनेचा दावा
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू आणि जुगार अड्डे सुरू आहेत. त्यामुळे राजरोसपणे अवैध धंदे चालू ठेवणाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना वसाहतीमधील नगरसेविका सपना नवले यांनी पोलीस ठाणे गाठून दारू व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्याच्यासोबत अनेक महिला उपस्थित होत्या. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना पोलीस निरीक्षक पवार यांनी मात्र बंदोबस्त जास्त असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा खुलासा करत एक प्रकारे अवैध व्यवसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेविकांना त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडेही तक्रार करण्याचा सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नगरसेविका नवले यांनी आपण कारवाई केल्यानंतर आम्ही संबंधित विभागांना ही निवेदन देऊन कारवाईसाठी भाग पाडू, असे म्हटल्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांनी महिलांना कारवाईचे आश्वासन दिले.