अकोला - नागपूर येथून एका औषध पुरवठा एजन्सीने चुकीचा पत्ता टाकून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केल्यामुळे शनिवारी शहरात गोंधळ उडाला. २ लाख १६ हजार रुपये किंमतीचे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असताना कंपनी विना ऑर्डर इंजेक्शन पाठवत आहे. मेडिकल चालकांना सोबत घेऊन या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
![Akola remdesivir injection news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-04-curier-remidisiver-injection-mh10035_24042021220448_2404f_1619282088_758.jpg)
काय आहे प्रकरण -
नागपूर येथील एका औषध पुरवठा करणाऱ्या एजन्सीने 'बाजाली मेडिकल' असा पत्ता टाकून ९० रेमडेसिवीर इंजेक्शन असलेला एक बॉक्स अकोला येथे पाठवला. यावेळी डिलिवरी करणाऱ्या कुरियर एजन्सीचा कर्मचारी हे इंजेक्शन गोरक्षण रोडवरील तिरूपती मेडिकलमध्ये घेवून आला. परंतु, मालकाने हे इंजेक्शन आपले नसल्याचे सांगितले. त्यानंतर तो कर्मचारी इंजेक्शन घेवून दुर्गा चौकातील बालाजी मेडिकलवर पोहचला. बालाजी मेडिकलच्या मालकानेसुद्धा हे इंजेक्शन त्यांचे नसल्याची माहिती कर्मचाऱ्याला दिली. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या कुरियर कर्मचाऱ्याने काही नागरिकांच्या मदतीने थेट अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला व इंजेक्शनचा साठा त्यांच्या स्वाधीन केला. अधिकाऱ्यांनी नागपूर येथील पुरवठादारासोबत संपर्क केला असता त्यांनी चुकीमुळे रेमडेसिवीर इंजेक्शन अकोल्यात पाठवण्यात आल्याची माहिती दिली. या सर्व प्रकारामुळे दिवसभर अधिकारी, मेडिकल चालक व कुरिअर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाला या इंजेक्शनचा नेमका मालक कोण हे शोधणे कठीण जाणार आहे. त्यासोबतच या कंपनीकडे कोणी इंजेक्शन मागितले होते, कंपनीने किती जणांना अशाप्रकारे पुरवठा केला आहे, हे शोधण्याचे आव्हान आहे. दरम्यान, याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
हेही वाचा - केंद्र सरकारने राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवला; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार