अकोला - दरवर्षी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी भक्तांच्या सोबत येणारी मानाची राजराजेश्वराची पालखी ही सोमवारी (17 ऑगस्ट) पोलिसांच्या बंदोबस्तात मंदिरात दाखल झाली. परंतु, पालखी गांधीग्राम येथून येत असल्याच्या माहितीवरून शिवभक्तांनी पालखीचे चौकाचौकात दुरूनच दर्शन घेतले. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने यावर्षी पालखी आणि कावड महोत्सवास परवानगी नाकारली होती. मात्र, शिवभक्त आणि कावड मंडळाच्या सदस्यांनी प्रशासनाच्या बैठकीत कावड काढण्यावर भर दिल्याने प्रशासनाने 20 सदस्यांसह मानाची पालखी काढण्यास काही अटींवर परवानगी दिली होती. त्यामुळे शहरात 'जय भोले' चा गजर निनादु शकला नाही.
श्रावण महिना म्हटला की अकोल्यात कावड व पालखी उत्सवाची धामधूम असते. शेवटच्या श्रावण सोमवारी लाखो शिवभक्त भरण्याची कावड काढतात. तर काही भक्त महादेवाची पिंड घेऊन पालखी काढतात. ही कावड आणि पालखी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पाणी आणतात. हे पाणी राजराजेश्वर मंदिरात आणून ते महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करतात. ही परंपरा 76 वर्षांपासून अखंड सुरू आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी यावर्षी सर्वच उत्सवांवर बंदीचे सावट आले आहे. त्यात श्रावण सोमवारी निघणाऱ्या पालखी व कावड यात्रा रद्द करण्यासाठी प्रशासनाने कावड मंडळ पदाधिकाऱ्यांशी बैठक केली. त्यामध्ये शेवटी एक निर्णय घेण्यात आला. मानाच्या पालखीला 20 सदस्यांच्या उपस्थितीत काढून ही परंपरा खंडीत होऊ न देण्याचे ठरले. त्यानुसार मानाची पालखी म्हणून असलेली राजराजेश्वर मंदिराची पालखी रविवारी (दि. 16 ऑगस्ट) रात्री काढण्यात आली. ही पालखी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी घेऊन पहाटे परत मंदिरात 20 सदस्यांच्या सहकार्याने दाखल झाली. भक्तांच्या गराळ्यात असणारी पालखी यावर्षी मात्र पोलीस बंदोबस्तात आली. मंदिरात आल्यानंतर पालखीचे राजराजेश्वराला पाच प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले.
दरम्यान, दरवर्षी कावड पालखीत 'जय भोले'चा निनाद होत असतो. परंतु, या कोरोनामुळे तो कुठेच जाणवला नाही. भक्तांची नाराजी असली तरी त्यांनी आपल्या घरीच पालखी व कावड उत्सव पूजा करून साजरा केला. विशेष म्हणजे, प्रशासनाने राजराजेश्वर मंदिरात कोणीच येऊ नये म्हणून मंदिराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर बॅरिकेट लावले होते. तिथे तडगा बंदोबस्त ही ठेवला होता.