अकोला : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राहुल गांधींकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते आज अकोल्यात माध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधत होते. गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी 7 जुलै रोजी मोदी आडनावावरून दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींविरोधात निकाल दिला आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
नरेंद्र मोदीं बाबर व्हायला निघालेले : शासकीय विश्रामगृह येथे पुढे ते म्हणाले की, त्यांनी मध्यंतरी घोषणा अशी केली की, नवीन सरकार येण्याच्या अगोदर युनिफॉर्म सिविल कोड लागू करणार. अनेक राजकीय पक्षांना मेल आले की, तुमचे म्हणणे मांडा. कमिशनला आम्ही उलट विचारले की, आम्ही कशावरती अभिप्राय द्यायचा आहे, ते आम्हाला पहिल्यांदा कळवा. दुर्दैवाने नरेंद्र मोदी बाबर व्हायला निघालेले आहेत. पण बाबर होण्याअगोदर घरात गॅस आहे की नाही हे त्यांनी बघितले नाही. अन्नधान्य आहे की नाही हे त्यांनी बघितले नाही.
यूनिफॉर्म सिविल कोडवरुन भांडण : त्यांच्या आता लक्षात आले की घर रिकामे आहे. यूनिफॉर्म सिविल कोडचा ड्राफ्ट तयार नाही. ड्राफ्ट तयार नसताना ते प्रतिक्रिया मागतात. युनिफॉर्म सिविल कोडचा ड्राफ्ट तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी स्वतःहून घेतली होती. पण त्यावेळेस या मंत्रिमंडळाने हा निर्णय मान्य केला नाही. ब्राह्मण क्षत्रिय यांचा विवाह होम आणि सप्तपदीने होतो. शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांचे लग्न हे अंतरपाट पद्धतीने होते. लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या विवाह पद्धतीपैकी कुठली तरी एक विवाहपद्धत स्वीकारायला हवी. लग्नविधी हा सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
हेही वाचा - Sambhajiraje on Ambedkar : औरंगजेबवरून छत्रपती संभाजीराजेंनी आंबेडकरांना सुनावले; म्हणाले, महाराजांपुढे...