अकोला - काश्मीर येथे सीआरपीएफच्या ४० जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याविरोधात शिवसेनेने आज पाकिस्तान देशाचा पुतळा दहन करीत घोषणाबाजी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पुतळा दहन करीत निवेदन दिले. तत्पूर्वी भारिप बहुजन महासंघाने वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला.
काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवानांना वीरमरण आले. या घटनेने संपूर्ण देश सून्न पडला असून सर्वच राजकीय पक्षांनी तसेच विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. शिवसेनेने गांधी चौकात आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवा जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पाकिस्तानविरोधी नारेबाजी करीत आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी शिवसेनेचे गोपाल दातकर, तरुण बघेरे, नगरसेवक गजानन चव्हाण, माजी नगरसेवक शरद तुरकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
तत्पूर्वी भारिप बहुजन महासंघ यांच्यातर्फे टॉवर चौकातील पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. या मूकमोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, पश्चिमचे शहर अध्यक्ष सीमांत तायडे, महिला आघाडीच्या पदाधिकारी तथा जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन आतंकवाद यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख यांनी गांधी जवाहर बागेजवळ शोक सभा घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.