अकोला - युतीच्या राजकारणात काँग्रेस नेत्यांची संघटना मातीत मिळवली. संघटन उभे करायचे असेल तर कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. न्याय मिळवायचा असेल तर त्यांना विधानसभेत 288 जागा लढवाव्या लागतील. तरच काँग्रेस तरेल. अन्यथा काँग्रेस 'एनजीओ'च राहील, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
सेनेला 135 जागा विधानसभेत मिळणार आहेत. भाजप व मित्र पक्ष 153 जागांवर लढणार आहे. सेनेचा मतदार हा राज ठाकरे सरळ कॅच करू शकतात. त्यांना यावेळी सोन्याची संधी आहे. राज ठाकरेंनी 153 मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे केले, तर शिवसैनिकांना ते आपल्याकडे ओढू शकतात, असा सल्लाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने राज्यात सोशल इंजिनिअरिंग केले. औरंगाबादमध्ये मुस्लिमांची मते मिळाली. उरलेल्या ठिकाणी मुस्लीम मते कॅच करता आली नाही. आधी मुस्लीम हे काँग्रेसची मते होती. आता ती पण दुसरीकडे वळली आहेत. तसेच मराठा समाजाची मते ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. परंतु, ही मतेही भाजप - सेनेला 80 टक्के मिळत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभेसाठी अनेक पक्षांतील इच्छुक आमच्या संपर्कात असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण बोलणी करत असल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होईल, असेही समजू नका आणि होणार नाही, असेही समजू नका, असे सुचक विधान त्यांनी केले. यासंदर्भात दोन-चार दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर शासनाने स्वतः शेतकऱ्यांसाठी पैसे देण्याची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. तसेच हवामानासंदर्भात देण्यात येणारे विविध अंदाज या पाठीमागे सीड लॉबी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सलाईन ट्रेकमधील 377 गावे तर प्रचंड दुष्काळ ग्रस्त आहेत. या ठिकाणी वेगळी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी सूचना त्यांनी शासनाला केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात डीपीडीसीचा निधी फिक्स करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात यावा, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार हरिदास भदे, राजेंद्र पातोडे, माजी मंत्री डी. एन. भांडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महादेव शिरसाट हे उपस्थित होते.