अकोला - पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून अवैधरित्या डिझेल काढून ती साठवणूक करून विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी वाशिम बायपास येथे छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल 24 लाख 85 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
टँकरचे चालक हे संगनमताने अवैधरित्या डिझेल काढून साठवून करायचे व त्याची विक्री करायचे. या गैरप्रकारातून त्यांना आर्थिक फायदा होत होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने तसेच विशेष पथक प्रमुख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वाशिम बायपास येथील गोडाऊनवर छापा टाकला. याठिकाणी एका ट्रक मागे एक डिझेलचा टॅकर (एमएच ३० एल ४५३४) उभा होता. त्या टँकरमधून काही लोक एका प्लास्टीकच्या पाईपने कॅनमधे डिझेल काढताना आढळले. पथकाने लगेच त्यांना ताब्यात घेतले.
कारवाईमध्ये याकुब खान युनूस खान (वय ४३ रा. नबाब पुरा मस्जीद जवळ नबाब पुरा), सैयद शोयब सैयद शेर अली (वय २१, रा. ख्वाजा नगर चीस्ता मस्जीद जवळ सोनटक्के प्लॉट जुने शहर), शेख काजीम शेख कासम (२४, रा. ख्वाजा नगर चीस्ता मस्जीद जवळ सोनटक्के प्लॉट जुने शहर) आणि टँकर चालक शफीकोद्दीन ख्वाजा बाओद्दीन (वय ३५, रा. राईस्लम चौक जिराबावड़ी खदान) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापासुन टॅकर, मोबाईल, साठवणूक केलेले डिझेल, बुलेट असा एकुण २४ लाख ८५ हजार १० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.