अकोला - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आयसोलेशन वॉर्डामध्ये आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणांमध्ये सिटी कोतवालीचे ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक यांच्यात शाब्दिक वार झाले. त्यामुळे ठाणेदार यांनी पोलीस अधीक्षकांची तक्रार अमरावती पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली असून या सर्व घटनेची नोंद त्यांनी ठाणे डायरीत घेतल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची दोन महिने आधीच गृहराज्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये बदली केल्याची घोषणा केली होती. परंतु, त्यांना अद्यापही रिलीव्ह करण्यात आलेले नाही. तर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एका पोलीस अधिकाऱ्यानी तक्रार केल्याची ही अकोल्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे आतातरी पोलीस अधीक्षक गावकर यांना रिलीव्ह करण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना पॉझिटिव रुग्णाने 11 एप्रिल रोजी आयसोलेशन वार्डातील स्वच्छतागृहांमध्ये गळा चिरून आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासात सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी हलगर्जीपणा दर्शविल्यामुळे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांना शिवीगाळही केली होती. या प्रकारामुळे ठाणेदार नाईकनवरे यांनी नाराज होऊन या संदर्भातील तक्रार अमरावती पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली होती. तसेच पोलीस अधीक्षक गावकर यांनी भ्रमणध्वनीवर केलेल्या संभाषणाची तसेच तक्रारीची नोंदही ठाणेदार नाईकनवरे यांनी सिटी कोतवालीच्या ठाणे डायरीत घेतली.
![पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-02-police-officer-complent-7205458_13042020110517_1304f_1586756117_1041.jpg)
विशेष म्हणजे, ठाणेदार नाईकनवरे हे आजारी रजेवर गेल्याची चर्चा आहे. याआधीही या त्रासामुळे ते बऱ्याच वेळा आजारी रजेवर गेलेले असल्याचे समजते. अमरावती पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रकरणात एक चौकशी समिती नेमली असून ठाणेदार नाईकनवरे यांची तडकाफडकी बुलढाणा येथे बदली केली आहे. तर, या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
![पोलीस अधीक्षक अमोघ गावकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-02-police-officer-complent-7205458_13042020110517_1304f_1586756117_403.jpg)
विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची दोन महिन्याआधी गृहमंत्री यांनी बदली केल्याचे विधानसभेमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या जागेवर अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही प्रशासनाला प्राप्त झाले होते. मात्र, अद्यापही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना रिलीव्ह करण्यात न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे, सध्या राज्यभरात संचारबंदी लागू असताना पोलीस विभागावर कामाचाही अतिरिक्त ताण आहे.