अकोला - सरकारने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा साठा आढळून आल्याप्रकरणी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत १९ जुलैला कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी दोन दुकानावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये प्लास्टीकच्या पत्रावळ्या, ग्लास, आणि द्रोण असलेले एकुण ४७ पोते जप्त केले.
मदनलाल गोपालजी सन्स आणि जोगी ट्रेडर्स येथे मंगळवारी मनपा अधिकाऱ्यांनी छापा टाकला. कारवाईमध्ये मदनलाल गोपालजी सन्स या गोडाऊनातून प्लास्टीक पत्रावळीचे २६ पोते, द्रोणचे १९ पोते तर जोगी ट्रेडर्स येथून प्लास्टिक ग्लासच्या १०१ पेट्या, नाश्ता प्लेटचे २ पोते साठा जप्त करण्यात आले.
नवीन किराणा बाजारात प्लास्टिकचा विविध वस्तूंचा साठा असल्याच्या माहितीवरून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी छापा टाकण्याचे आदेश दिले होते. प्लास्टिकचे एकुण ४७ पोते जप्त करण्यात आलेल्या टीममध्ये मनपा उपायुक्त विजय म्हसाळ, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पी.एम. मेहरे, क्षेत्र अधिकारी संतोषकुमार चव्हाण, मोटर वाहन विभागाचे श्याम बगेरे, बाजार विभागाचे गौरव श्रीवास, आरोग्य निरीक्षक शैलेश पवार आदींची उपस्थिती होती.