अकोला - लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मतदान करण्यात आले. आतापर्यंत अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडल्याची घटना घडलेली नाही.
अकोला लोकसभा मतदार संघात 1751 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. मतदार संघात जवळपास मतदान झाले होते. कवठा येथील मतदान केंद्रावरील मशीन तोडण्याची घटना वगळता इतर कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडलेला नाही. अकोला लोकसभा मतदार संघातील 40 मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. या केंद्रांवर पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आले आहेत. त्यातील जुन्या शहरातील शिवाजी शाळा, टाऊन शाळा, महापालिका शाळा क्र. 19 यासह शाळा क्र. 10 हे अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या केंद्रापासून शंभर मिटरपर्यंत रस्ता बंद करण्यात आला आहे. वाहनेही दुसरीकडे वळविण्यात आली आहेत. तसेच या केंद्रावर पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह भरारी पथकही भेटी देत आहेत.
या सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले आहे. सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी 32.07 टक्के होती. उन्हाची तिव्रता वाढली असल्याने केंद्रावर मतदारांची संख्या रोडावली आहे. दुपारी साडेचारनंतर मतदार पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी करतील. शेवटच्या टप्प्यात टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.