अकोला - पावसामुळे कांदा खराब झाल्याने आवक घटली आहे. तसेच काही प्रमाणात चांगला कांदा शेतकऱ्यांनी साठवूण ठेवल्याने कांद्याचे दर वाढत आहे. कांद्याचे भाव एका आठवड्यात 30 रुपयांवरून 60 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. शिवाय हे दर 80 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यावसायिक मूलचंद डोडेजा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने शेतातील चांगली पिके खराब झाली. याचा सर्वाधिक फटका फळबाग आणि भाजीपाला पिकांना बसला. तसेच कापूस, सोयाबीनसह कांद्यालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नवीन येणारा कांदा खराब झाला आहे. साठवून ठेवलेला जुना कांदा कमी आहे. तसेच परराज्यातुन अचानक मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वधारले आहे. आठवड्यात दुप्पटीने कांद्याचे दर चढले आहे. त्यामुळे दरवाढीचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. दिवाळीपर्यंत कांदा शंभर रुपये प्रति किलो जाण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 60 रुपये प्रति किलो दराने कांदा विकल्या जात आहे.