अकोला - स्वातंत्र्यदिन हा केवळ सुट्टीचा दिवस नसून जाज्वल्य देशभक्ती द्विगुणीत करण्याचा सण आहे. देशभक्तीची भावना अबालवृद्ध व युवक-युवतीमध्ये तसेच सर्व समाजमनात रुजविण्याकरीता मागील दोन दशकापासून येथील संघटना, मंडळे एकत्र येवून स्वातंत्र दिन साजरा करतात. यावर्षी 1 किमी लांबीच्या तिरंग्यासह ढोल-ताशांच्या निनादात भव्य अशा तिरंगा ध्वजयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा.संतोष हुशे यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नॅशनल इंटीग्रीटीमिशन, वंदे मातरम संघटना, दुशे बंधू ज्वेलर्स, नवयुवक नवदुर्गोत्सव मंडळ, गोरक्षण रोड, समर्थ एज्युकेशन इंस्टीट्यूट आदी संघटना एकत्र येवून स्वातंत्र दिन साजरा करतात. या आधी देखील येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांची दखल संपूर्ण भारतवासीयांनी घेतली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने विश्वविक्रमी भारताचा सर्वात मोठा ध्वज, 100 फूट उंचीचे अब्दुल कलाम यांचे तैलचित्र, एक एकराची देशभक्तीची रांगोळी, 76 मिटर लांबीचा केक, हत्ती-घोड्यांची रॅली, 400 थोर पुरुषांची ओळखयात्रा, तिरंगी पोषाखातील मोटार सायकल रॅली, तिरंगी एअर शो अशा अनेक कार्यक्रमांचे अकोलेकरांनी कौतूक करुन त्यात आपला सहभाग घेतला होता. त्याच परंपरेला अनुसरुन यावर्षी 1 किमी लांबीच्या तिरंग्यासह ढोल-ताशांच्या निनादात अशी तिरंगी ध्वजयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
या ध्वजयात्रेची सुरुवात सकाळी 9 वाजता जुने इन्कमटॅक्स चौक, गोरक्षण रोड येथुन होऊन नेहरु पार्क, सिव्हील लाईन चौक, पोस्ट ऑफीस, बस स्टॅन्ड , कोतवाली, तिलक रोड, अकोट स्टॅन्ड मार्गे अग्रसेन चौक येथुन अकोला क्रिकेट क्लबवर या तिरंगी ध्वजयात्रेचा समारोप होणार आहे. एक किमी लांब ध्वजाचा विक्रम अकोल्याच्या नावे होणार असून त्याचा पाव हिस्सा देखील आजपर्यंत कुणी तयार केला नाही. या ध्वजाच्या निर्मितीचे काम उंबरकार टेन्ट वर्क येथे सुनिल उंबरकार यांच्या नेतृत्वात जोमात सुरू आहे. या अफाट ध्वजाला आपण सर्वांनी मिळून हातभार लावायचा असून या विशाल ध्वजाप्रती आपले राष्ट्रप्रेम प्रगट करावयाचे आहे, असे आवाहन अविनाश देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी प्रा. प्रकाश डवले, उमेश मसने, पिंटू वानखडे, राजेश भन्साली, हरिष बुंदेले, मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते.