अकोला - बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी परिसरात असलेल्या एका धाब्यावर गॅसची वाहतूक करणाऱ्या टॅंकरखाली सापडून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. अकबर शहा असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर टँकरचालक पसार झाला असून, पोलिसांनी टँकर जप्त केला आहे.
अपघाताचे कारण अद्याप गुलदस्त्यात
राष्ट्रीय महामार्गावरील दाळंबी परिसरात एका धाब्यावर गॅस वाहून नेणारा टॅंकर मोकळ्या जागेत उभा केला होता. दरम्यान, टॅंकरचालक परत आपला टॅंकर घेऊन अकोल्याकडे निघाला असता, हा अपघात झाला. या अपघातात अकबर शहा हुशेन शहा यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुर्तीजापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल केला आहे.