अकोला - नखेगाव शहानूर नदीपात्रामध्ये गावठी दारू तयार करून विकणाऱ्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये एकाला अटक करण्यात आली असून दोघे अद्याप फरार आहेत. संबंधित कारवाई दरम्यान 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नखेगाव येथील शहानूर नदीपात्रामध्ये काही व्यक्ती गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली. यानंतर अधीक्षकांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन छापा टाकला.
पोलिसांनी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट केले असून 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अविनाश सावतराम बघे, अविनाश मुंडाले उर्फ कुबडा, दादाराव रामचवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश बघे यास अटक झाली असून अन्य दोघे फरार आहेत.