अकोला - जिल्ह्यात गेल्या दहा एप्रिलनंतर कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आलेला नाही. दरम्यान, अकरा एप्रिलला कोरोना रुग्णाने आत्महत्या केली होती. अकोल्यात एकही रुग्ण न आढळल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. अकोल्यात आतापर्यंत 13 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. तरी 60 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. या अहवालानंतरच आता रुग्ण संख्येत वाढ होईल किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून सकाळी पावणे दहा वाजता प्राप्त माहितीनुसार, कोरोना संशयित 15 नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, आतापर्यंत एकूण 236 पैकी 176 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 163 अहवाल निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर 60 अहवाल हे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, नमुने तपासणी अकोल्यात सुरू झाल्याने नागपूर येथून अहवालाची वाट पाहणे बंद झाले आहे. दरम्यान, ज्या परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तो परिसर सील करण्यात आला असून या परिसरातील आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, तोंडावर बाहेर निघताना मास्क किंवा रुमाल न बांधणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे