अकोला - सोशल मीडियावर मैत्री करून त्या माध्यमातून 50 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला अकोट शहर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला आहे. चिमा स्टेनली अलीगबे, असे अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा... राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्याच्या हत्येसाठी दिली होती ४० लाखांची सुपारी, चौघे ताब्यात
अकोट येथील श्याम भुयार यांच्यासोबत सारा स्टिव्हन नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवून नायजेरियन व्यक्तीने मैत्री केली. आपण दोघे मिळून भारतात व्यवसाय उभा करू, असा विश्वास सारा स्टीव्हन नावाच्या बनावट व्यक्तीच्या नावाने श्याम भुयार यांना दिला. भुयार यांचा विश्वास संपादन केल्यानंतर पुढे भारतात भेटीसाठी येत असल्याबाबतचे विमानाचे टिकट व्हॉटसअपवर पाठविले. त्यासोबत मौल्यवान भेटवस्तु आणल्या असुन त्याचा टॅक्स भरावयाचा आहे. यासाठी श्याम भुयार यांना त्याने बँक खात्यावर वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगितले.
त्यानुसार भुयार यांनी 50 हजार रुपये त्या खात्यावर टाकले. मात्र, काही दिवसांनी त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तपासासाठी सायबर सेलची मदत घेतली. सारा स्टीव्हन या बनावट नावाने तक्रारदाराची फसवणूक करणारा हा व्यक्ती चिमा स्टेनली अलीगबे नावाचा नायजेरियन व्यक्ती असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास दिल्ली येथून अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडुन गुन्ह्याशी संबधीत दोन अँन्ड्रॉइड मोबाईल फोन व दोन साधे मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले. ही कार्यवाही अकोट शहराचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक, पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकुर, सुल्तान पठाण, विठठल चव्हाण, अंकुश डोबाळे तसेच सायबर सेलचे अंशात केदारे, अतुल अजने यांनी केली.
हेही वाचा... धावत्या रिक्षात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाच्या तावडीतून सुटकेसाठी पीडितेची उडी