अकोला - अमोल मिटकरींनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून निवडणुकीत जाहीरसभा घेतल्या. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात 'अमोल मिटकरींना आमदार करणारच'! असे सांगितले होते. त्यानुसार मिटकरींना उमेदवारी देण्यात आली. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला 2009 नंतर अमोल मिटकरी यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार मिळणार आहे.
विधानपरिषदेचा 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील अमोल मिटकरी यांचे नाव निश्चित झाले आहे. कुटासा सारख्या छोट्याशा गावातील शेतकरी पुत्राला राष्ट्रवादीचा आमदार होण्याची संधी निर्माण झाली आहे.
बारामती येथे शारदा व्याख्यानमालेत अजित पवार यांनी मिटकरींचे भाषण ऐकल्यावर वक्तृत्वशैलीचे कौतुक केले होते. तसेच सोबत काम करण्याची संधी दिली. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात 'अमोल मिटकरीना आमदार करणारच'! असे सांगितले. खासदर डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून त्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका लागल्याने 'स्टार प्रचारक' म्हणून मिटकरींनी भूमिका बजावली आहे.
2004 ते 2009 या कालावधीत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघतून तुकाराम बिडकर यांच्या रूपाने राष्ट्रवादीला विधानसभेत पहिले आमदार मिळाले होते. त्यानंतर अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार झाला नाही. आता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदार म्हणून राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे अकोल्याचे आमदार होणार आहेत. विशेष म्हणजे, विधानसभेचे भाजपचे चार, शिवसेनेचे एक आमदार आहे, तर विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून गोपीकिशन बाजोरिया निवडून गेलेले आहेत. त्यामुळे आता अकोल्यात मिटकरी यांना धरून सात आमदार होतील.