अकोला - मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राज्यभर 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' आंदोलन छेडले आहे. सरकारच्या अध्यादेशामुळे खुल्या प्रवर्गातील मेहनती आणि पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश कसा मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यातही तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
घटनेने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरवून देण्यात आली आहे. असे असतानाही भाजपप्रणित राज्य शासनाने संविधानाने दिलेल्या पळवाटांचा वापर करत नैतिकतेला हरताळ फासून हे आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. या आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे, या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने आजपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे.
‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या घरासमोर 'थाली बजाओ' आंदोलन करून निवेदन देण्यात आलेले आहे. राज्य शासनाच्या या अतिरिक्त आरक्षणामुळे गुणवत्ताधारक खुल्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे. छत्तीस हजार मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षणातून केएम मुंबई सारख्या नामवंत महाविद्यालयात अस्थिव्यंग या नामांकित कोर्सला प्रवेश मिळाला. तर चार हजार मेरिट लिस्ट क्रमांक असणाऱ्या खुल्या कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही जागा यामध्ये मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणी व हुशार विद्यार्थ्यांचे या आरक्षणामुळे नुकसान होत आहे. असे बोलत यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या. हे धरणे आंदोलन तीन दिवस चालणार आहे.