अकोला - म्हैस शोधण्यासाठी गेलेल्या तिघी मायलेकींचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या गावात सोमवारी सकाळी उघडकीस आली. सारिका सुरेश घोगरे (वय 42 वर्षे), वैशाली सुरेश घोगरे (वय 16 वर्ष) अंजली सुरेश घोगरे (वय 14 वर्ष) असे तलावात बुडालेल्या मायलेकींची नावे आहेत.
हरवलेली म्हैस शोधायला गेल्या होत्या मायलेकी - दगडपारवा येथील सारिका सुरेश घोगरे यांची म्हैस रविवारी हरवली होती. त्यामुळे गावाशेजारील परिसरात या तिघी मायलेकी म्हशीचा शोध घेत होत्या. आपली म्हैस तलावाशेजारील शेतात असल्याची माहिती त्यांना समजली होती. त्यामुळे त्या तिघी मायलेकी म्हशीला आणण्यासाठी तलावाकडे म्हशीचा शोध घेत होत्या.
शॉर्टकटने घात केला, अन् तिघीजणी बुडाल्या - दगडपारवा गावातील तालावाच्या शेजारील शेतात म्हैस असल्याची माहिती मिळाल्यामुळे सारीका, वैशाली आणि अंजली या तलावा शेजारुन जात होत्या. मात्र तलावाला वळसा घालून गेल्यापेक्षा कालव्यातून पलिकडे जाऊ, असा विचार त्यांनी केला. त्यामुळे तिघीही मायलेकी कालवा ओलांडून पलिकडे जात होत्या. सुरुवातीला आई सारीका यांनी पाण्यातून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडत होत्या. हे पाहून त्यांची मोठी मुलगी वैशालीने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पण पाण्यात बुडत असल्याचे पाहून लहान मुलगी अंजलीने या दोघींना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. परंतु, तीही या पाण्यात बुडाली. या तिघांचाही शोध रविवारी दुपारपासून सुरू होता. मात्र, त्या मिळाल्या नाही.
शोध घेऊनही सापडले नाहीत मृतदेह - म्हैस शोधम्यासाठी तलावात बुडालेल्या तिघी मायलेकींचा शोध रविवारी दुपारपासून सुरू होता. मात्र त्यांचे मृतदेह शोधूनही सापडले नाहीत. सोमवारीही मृतदेहाची शोधाशोध सुरू करण्यात आली. त्यावेळी तलावांमध्ये या तिघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना आढळून आले. त्यामुळे तिघींचेही मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले. या घटनेची माहिती बार्शिटाकळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.