अकोला - जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी उलटली आहे. शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत द्यावी. तसेच या संदर्भात महसूल विभागाने पिकांची परिस्थिती संदर्भात पाहणी करून राज्य शासनाकडे त्वरित अहवाल पाठवावा, अशी आग्रहाची मागणी आमदार रणधीर सावरकर केली. तसेच या संदर्भात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांच्याशी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या संबंधी चर्चा करून त्वरित यावर उपाय योजना जाहीर करण्यासंबंधी अभिवचन घेतले.
तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यात उद्या २४ जुलैपासून सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २० जूनपासून पेरणीला सुरुवात केली. परंतु, पावसाने अनेक दिवसांपासून दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढले आहे. या बाबत गेल्या ८ दिवसांपासून आमदार सावरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून मदतीची मागणी केली होती. पाटील यांनी महसूल विभागाचा अहवाल प्राप्त होताच त्वरित मदतीसाठी मंत्रामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्याचे अभिवचन दिले. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना. सुभाषराव देशमुख यांनी सुद्धा या बाबत सकारात्मक अभिवचन दिले आहे.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अनिल गावंडे, गणेश अंधारे, गणेश लोड, संतोष वाकोडे पाटील, प्रवीण पाटील हगवणे, पंकज वाडीवाले, ज्ञानेश्वर पोटे, विशाल जैस्वाल, अंबादास उमाळे, धीरज शिरसाट, बाळकृष्ण गावंडे, जयकुमार ठोकळ, अरुण गवळी, गोपाल मुळे, दिनेश गावंडे, लखन वाकोडे, प्रशांत शिरसाट, विठ्ठल मदनकर, संतोष राणे, आदी या वेळी उपस्थित होते.