अकोला : सरकारच्या निष्काळजीपणामुळे या महाराष्ट्रातल्या सद्गुरू परिवारातील 14 लोकांचे जीव गेला. आणखी काही लोक अस्वस्थ आहेत. काही लोक रुग्णालयात भरती आहेत. मी स्वतः राज्यपालांना पत्र लिहिले आहे. या सगळ्या प्रकारची शहानिशा करून कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यावर मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमांत ज्यांनी लांबलचक भाषण दिले त्यांच्यावर देखील कारवाईची करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिटकरी यांनी आज केली आहे. ते आज त्यांच्या निवस्थानी अकोल्यात बोलत होते.
भाजप सोबत जाण्याच्या मिथ्य चर्चा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याच्या मिथ्या चर्चा आहेत. स्वतः पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिले. जे आमदार भेटायला गेलेत ते नियमानुसार दर आठवड्याला मंगळवारी विधानभवनामध्ये अजित पवारांच्या दालनात बसलेले असतात. त्यांना भेटायला जाणार साहजिक आहे. ते विरोधी पक्षनेते आहेत. ते आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी स्वतः काल सायंकाळी त्यांच्यासोबत बोललो. या चर्चेमध्ये कुठलाही अर्थ नाही. जर एखाद्या इंग्रजी वृत्तपत्रांनी अशी बातमी छापून आणली असेल तर, त्या बातमीत किती टक्के खरे आहे, ती कोणी पेरली हे सुद्धा तपासलं पाहिजे.
नेमकी काय आहे घटना ? : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ७ लाख लोक उन्हात होते. हा कार्यक्रम दिवसाढवळ्या आयोजित केल्यामुळे आणि आयोजकांच्या चुकीच्या नियोजनामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम होता. पण सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, सचिन धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा, अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भाषणे झाली. सूत्र आयोजकांनी बराच वेळ घेतला. त्यामुळे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम संपला. चाकरमान्यांना कार्यक्रमाच्या बाहेर येण्यास तीन ते चार तास लागले. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण कसे करता येते हे भाजपने आज दाखवून दिले आहे. मुंबईत शाहासमोर शक्तीप्रदर्शन झाले. पण सभेतील गर्दी अराजकीय होती आणि ती श्री सद्गुरूंच्या कुटुंबातील होती. अध्यात्माचे राजकारण आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असे अमोल मिटकरी म्हणाले.