अकोला - दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 'भारत बंद'ची हाक विविध शेतकरी संघटनांनी दिली आहे. या आंदोलनाला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकाने खुली केली होती. परंतु, कॉंग्रेसच्या रॅलीमुळे अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. रॅली दुकानासमोरून गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकानं उघडली. त्यामुळे 'भारत बंद'चा थेट परिणाम अकोल्यात जाणवत नाहीय. काही ठिकाणी कडक बंद पाळण्यात आला आहे. तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून देशातील शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली. यामध्ये राजकीय पक्षांनी उडी घेत या बंदला पाठिंबा दर्शवला. अकोल्यामध्ये भारत बंदला व्यापाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. सकाळपासून बाजारपेठ सुरू झाली होती. परंतु, काँग्रेसची रॅली येत असल्याची माहिती मिळताच काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली.
तर काही व्यापाऱ्यांनी रॅली दुकानासमोर आल्यानंतर दुकानं बंद केली. परंतु, दुकानांसमोर काँग्रेसची रॅली गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी परत दुकानं उघडली. त्यामुळे या बंदला अकोल्यामध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी अल्प प्रतिसाद देत हा बंद अपयशी ठरल्याचं चित्र आहे.