अकोला - लेखी परीक्षा या ऑक्टोबर २०२०च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येतील तसेच प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर २०२० या कालावधीत महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत, असे आदेश विद्यापीठामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची विनंती कुलगुरू अमरावती विद्यापीठ यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्व विद्यापीठातील परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. राज्यपाल यांनी सर्व स्थापित विद्यापीठातील कुलगुरूंना ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया निकाला सहीत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांनी पाच व सहा सप्टेंबर रोजी विद्यापरिषद परीक्षा व मूल्यमापन मंडळ तथा व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणाच्या तातडीच्या अभ्यास सभा पार पाडल्या. त्यामध्ये अंतिम सत्राच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे. याशिवाय इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. हे निवेदन कुलगुरू यांच्यावतीने विद्या परिषद सदस्य, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती तथा ल. रा. तो महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य श्रीप्रभू चापके यांनी स्वीकारले.
यावेळी आदित्य दामले, पंकज साबळे, सौरभ भगत, ललित यावलकर, सतीश फाले, राकेश शर्मा, विकास मोळके, सचिन गव्हाळे, आकाश गवळी, सुरज पातोंड आदी उपस्थित होते.