अकोला - महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील व अग्रगण्य राज्य आहे. हा महाराष्ट्रातील सर्व नागरीकांचा सन्मान आहे. आपले राज्य सर्व क्षेत्रात अग्रेसर राहावे व राज्याचा लौकिक वाढावा याकरीता महाराष्ट्रातील सर्व नागरीकांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या ५९ वा वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ लालबहादुर शास्त्री स्टेडियम येथे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदींसह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.
काटकसरीने वापरा पाणी -
पालकमंत्री म्हणाले की, १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे. या घटनेला आज ५९ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती करीता अनेक नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्वांना वंदन करीत पाटील यांनी उन्हापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने सर्व नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगुन पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
यानंतर विविध विभागांनी काढलेल्या परेड संचालनाची पाहणी करुन पाटील यांनी मानवंदना स्वीकारली. तसेच स्वातंत्र संग्राम सैनिक व उपस्थित नागरीकांच्या भेटी घेतल्या. परेड संचालनामध्ये पोलीस विभागाचे ४ पथक, पोलीस विभागाचे महिला पथक, गृहरक्षक दलाचे महिला पथक, पोलीस बँन्ड पथक, पोलीस श्वान वाहन, बिनतारी संदेश वाहन, महानगरपालिकेचे अग्नीशामक दलाचे वाहन यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले.