अकोला - पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मुर्तीजापूर शहरात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर केली आहे. या कारवाईत 6 आरोपींकडून 6 लाख 53 हजार 632 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मुर्तीजापूर शहरात करण्यात आली.
मुर्तीजापूर शहरातून दोन सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावरून मोठया प्रमाणात अवैधरित्या दारू ग्रामीण भागात पाठविली जात होती. अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरीता गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला याबद्दलची माहिती मिळाली. या माहितीवरून दोन्ही ठिकाणी भगतसिंह चौक मुर्तीजापूर तसेच चिखली रेल्वे गेट येथे नाकाबंदी करून सापळा रचण्यात आला.
पथकाने दोन्ही ठिकाणावरून एकूण ५७ देशी दारूच्या पेट्या, टॅक्स मालवाहू गाडी तसेच ओमनी असा एकूण ६ लाख ५३ हजार ६३२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अक्षय उर्फ सोनु मिलींद पंडागळे, पराग नरसिंग हितांगे, आकाश विश्वास पांडे, गाडी मालक इशाद शहा, गाडी मालक रोहीत अवलवार तसेच एक फरार आरोपी विरोधात मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये तसेच मोटर वाहन अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुर्तीजापूर शहर पोलीस करीत आहेत.