अकोला - पांढऱ्या कापसासारखा आणि त्याच गुणधर्माचा असलेल्या खाकी रंगाच्या कापसाची पेरणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनीरंभापूर येथील मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र येथे करण्यात आली आहे. साडेबारा एकराच्या क्षेत्रात हा खाकी कापूस पेरण्यात आला आहे. 'वैदेही 95' असे या कापसाचे नाव असून देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. हा अमेरिकी प्रजातीचा कापूस आहे.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बीजोत्पादन कापूस घेण्यात आला आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमधील संशोधक डॉ. विनिता गोतमारे यांनी हे बीज तयार केले आहे. रायमंडी आणि थरबेरी या रानटी कापसाच्या प्रजातीचे मिश्रण करून ही प्रजाती तयार करण्यात आली आहे. या कापसाचा गुणधर्म म्हणजे यापासून कोणतेही त्वचेचे आजार होत नाहीत. तसेच ऊन तापेल तसा कापसाचा खाकी रंग आणखी गडद होत राहील.
कृषी विद्यापीठाच्या वनीरंभापूर येथील मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र येथे २८ जून २०१९ ला साडेबारा एकरात 30 किलोची पेरणी केली होती. या कापसाचा पहिल्या वेचणीला अंदाजे 20 क्विंटल कापूस निघाला. एकरी ४ क्विंटल कापसाचे उत्पादन होऊ शकते. कापसाची ही प्रजाती 'नॉनबीटी' असून पहिल्या पेरणीत या कपाशीवर बोंडअळी आली नाही. तसेच लाल्याचा प्रभावही कमी होता. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य बीजोत्पादन अधिकारी डॉ. तारासिंग राठोड हे या परिक्षेत्रावर कापसाची पाहणी करीत आहेत.
मुंबई येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. पी. जी पाटील यांनी हा कार्यक्रम सीआयसीआर नागपूर यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाला दिला. आता डॉ. पाटील हा कापूस मुंबई येथे घेऊन जाणार आहेत. याचे बीज तयार केला जाईल. तसेच कापूस वेगळा करून याचा कापड देखील तयार करता येईल. तसेच भविष्यात या कापसाचे बियाणे बाजारात येऊ शकतात.