अकोला - अकोट विधानसभा मतदारसंघात पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देऊ नये अशी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत हा मुद्दा सोमवारी प्रकर्षाने समोर आला. याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष संघटन हे मजबूत असून, नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते यांची समजूत काढण्यात आली आहे. तसेच पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणू, असा विश्वास नाराज कार्यकर्त्यांनी दिला असल्याचे सांगितले.
आज सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाचही विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बावनकुळेंनी घेतल्या. यात जिल्ह्यातील 73 इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती आहे. इच्छुकांच्या अर्जाची पाहणी करून त्यांना प्रश्न विचारून मुलाखती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुलाखती देण्यासाठी आलेल्या इच्छुकांना शक्ती प्रदर्शन करण्याचा मज्जाव करण्यात आला होता. तसेच कुठल्याही प्रकारचा तामझाम न करण्याचेही सूचित करण्यात आले होते. दरम्यान, पक्ष शिस्त पाळण्याच्या कठोर सूचनांचे इच्छुकांनी पालन केल्याचे आज दिसून आले. हे विशेष.
मतदारसंघ निहाय इच्छुकांची संख्या -
आकोट - 32
बाळापूर - 16
मुर्तीजापूर - 14
अकोला पश्चिम - 08
अकोला पुर्व - 03