अकोला - कोविड भत्ता मिळत नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील(जीएसएम) १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड वार्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जीएमसी प्रशासनाकडून कारवाईच्या उद्देशाने डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मागील सहा महिन्यांपासून नॉन कोविडसह कोविड वार्डातही निरंतर रुग्णसेवा देत आहे. कोविडमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला कोविड भत्ता दिला जातो. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना हा भत्ता मिळत आहे. असे असताना आम्हालाच का वंचित ठेवले जात आहे, असा प्रश्न या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
जीएमसी प्रशासनाने अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडे कोविड भत्त्याचा प्रस्ताव न दिल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गुरुवारी स्वत:च जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रस्ताव दिल्याची माहिती उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्रंदिवस कोविड वार्डात रुग्णसेवा देत आहेत. रुग्णसेवा देताना आतापर्यंत १६ प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यातील काही डॉक्टरांना तर दोन वेळा कोरोनाची लागण झाली आहे. जीएमसी प्रशासनाने मात्र, डॉक्टरांना नोटीस देऊ केली आहे. त्यामुळे डॉक्टर आणि जीएमसी प्रशासन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.