अकोला - कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-19' असा उल्लेख केल्याच्या प्रकरणात कृषी मंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन सदस्यीय समितीने चौकशी केल्यानंतर हा अहवाल कृषी मंत्रालय व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेकडे बुधवारी पाठविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकेवर प्रमोटेड कोविड -19 असा शिक्का प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या चांगलाच अंगलट आला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यसोबत खेळण्याचा हा प्रकार होत असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. या विषयाबाबत कृषी मंत्री दादाराव भुसे यांनी ही गंभीरता दाखवत चौकशीचे आदेश दिले होते. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अशा प्रकारचे शिक्के मारून देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्या विद्यार्थ्यांना अशा गुणपत्रिका मिळाल्या असतील त्यांना नवीन गुणपत्रिका देण्याचेही त्यांनी आदेश दिले. परंतु, या सर्व प्रकारामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना गोंधळलेल्या विद्यापीठाने आपली चूक झाल्याचे मान्य करीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
प्रमोटेड कोविड 19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका या विद्यार्थ्यांना देण्यात येणार नव्हत्या. ही व्यवस्था फक्त विद्यापीठाच्या माहितीसाठी संगणकात करून ठेवण्यासाठी आली होती. कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे नुकसान कधीच करणार नाही, अशी प्रतिक्रिया कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली आहे.