अकोला - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने शिवणी येथे देशातील पहिले सौर उर्जेवर चालणारे अत्याधुनिक गोदाम सुरू केले आहे. सौर ऊर्जेवर चालणारे, वातानुकूलित आणि आद्रता विरहित अशी या गोदामाची वैशिष्ट्य आहेत.
सौर गोदामाचा प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अर्थसाह्य निधीमधून उभारण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक बियाण्यांची साठवणूक सुविधा झाल्याने त्याचा लाभ महाबीजसह शेतकऱ्यांना होणार आहे. संपूर्ण प्रकल्प हा सौर उर्जेवर आधारित आहे. प्रकल्पामध्ये बियाण्यांच्या दर्जानुसार साठवणूक करण्यासाठी आद्रता आणि तापमानानुसार सहा स्वतंत्र दालन तयार करण्यात आली आहेत.
ही आहेत गोदामाची वैशिष्ट्ये-
- गोदामात साठवणूक केल्यावर बियाण्याची उगवणशक्ती आणि जोम अधिक कालावधीकरिता टिकून ठेवणे शक्य होणार आहे.
- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महाबीजने पहिल्यांदाच सौर गोदाम सुरू केले आहे.
- हे गोदाम कार्यान्वित झाल्याने भविष्यात वातावरणामुळे होणारी हानी रोखून गुणवत्ता राखता येणे शक्य झाले आहे.
- पुढील हंगामासाठी बियाणे उपयोगात आणता येणार असल्याचे महाबीज महाव्यवस्थापक प्रशांत पागृत यांनी सांगितले.
अशी आहे गोदामाची साठवण क्षमता-
दालन क्रमांक एकची साठवण क्षमता चाळीस मेट्रिक टन आहे. दालन क्रमांक दोनची साठवण क्षमता 220 मेट्रिक टन इतकी आहे. दालन क्रमांक तीनची साठवण क्षमता 130 मेट्रिक टन आहे.
दालन क्रमांक चारची साठवण क्षमता 130 मेट्रिक टन आहे. तर दालन क्रमांक पाचची साठवण क्षमता 190 मेट्रिक टन आणि दालन क्रमांक सहाची क्षमता 290 मेट्रिक टन इतकी आहे. या संपूर्ण दालनातून सुमारे एक हजार मेट्रिक टनपर्यंत साठवणूक क्षमता महाबीजला उपलब्ध झाली आहे.