अकोला - जिल्हा न्यायालयातून अनेक वकिलांनी आपली न्यायव्यवस्थेत वेगळी छाप सोडली आहे. येथील वकील न्यायाधीश होऊन त्यांनी चांगल्याप्रकारे न्यायदानाचे काम केले आहे. त्या ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवून न्यायादनाचे पवित्र काम करताना अभिमान वाटत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटले आहे. अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रशासकीय उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रवी देशपांडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे व अकोला न्यायिक पालक न्यायाधीश प्रदीप देशमुख, नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश सुनील शुक्रे, न्यायाधीश जका अ. हक, न्यायाधीश विनय देशपांडे, न्यायाधीश रोहित देव, विधी व न्याय विभाग मंत्री डॉ. रणजित पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश यनशिवराज खोब्रागडे, अकोला बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र शाह हे उपस्थित होते.
गवई म्हणाले, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. अकोल्याशी माझे ऋणानुबंध आहेत. न्यायपालिकेचे पावित्र्य राखण्याचे काम वकिलांचे आहे. त्यांनी ते योग्यरितीने पाळले तर ही न्यायपालिका आणखी ससमृद्ध होईल. प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश खोब्रागडे यांनी केले. यावेळी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एव्हिडन्ससुद्धा डिजिटल व्हावे - पालकमंत्री पाटील
बदलत्या आव्हानानुसार शासनही बदल करण्यास कटिबद्ध आहे. पुरावे सुध्दा डिजिटल व्हावेत, यासाठी प्रयत्न करीत आहोत. बार असोसिएशनचे ग्रंथालय डिजिटल करण्यास मदत करेन, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.